अध्यक्ष पदावर रोहन खुटेमाटे तर उपाध्यक्ष पदावर विश्वास कोंगरे यांची सर्वानुमते निवड
भद्रावती :आजकाल राजकारणात घराणेशाही व त्याच त्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व दिल्या जात असते. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते व युवा वर्ग यांच्या निष्ठेवर अन्याय होतो. म्हणून घराणेशाहीला फाटा देत सहकार क्षेत्रात नवीन युवा चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे कार्य यापुढे करु. विविध कार्यकारी सहकारी संस्था ही या बदलाची नांदी ठरेल व यापुढचे सहकार क्षेत्रातील असो की स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकारण असो, होतकरू नव्या दमाच्या युवा नेतृत्वाला संधी देवू असे वक्तव्य चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांनी केले.
विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., भद्रावती र.न. ८५७ करीता नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे व पंचायत समिती सदस्य नागो बहादे यांच्या नेतृत्वातील शेतकरी, शेतमजूर सहकार पॅनलचे सर्व १३ उमेदवार मताधिक्याने निवडून आले. निवडून आलेल्या उमेदवारांनी सर्वानुमते या सहकारी संस्थेचे अध्यक्ष पदावर रोहन कवडु खुटेमाटे तर उपाध्यक्ष पदावर विश्वास पुरुषोत्तम कोंगरे यांची निवड केलेली आहे. याप्रसंगी रवि शिंदे बोलत होते.
सदर सहकारी संस्थेची निवडणूक ही अत्यंत संवेदनशील रीत्या पार पडली. संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. अनेक अनुचित प्रकार विरोधी पॅनलच्या नेतृत्वाकडून झाले. लोकप्रतिनिधी मतदान कक्षासमोर बसले होते. तक्रारी, न्यायालयीन प्रक्रिया आदी अनेक सोपस्कार पार पडले. पोलीस विभागाच्या संरक्षणात लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया व मतमोजणी पार पडली. यात शेतकरी, शेतमजूर सहकार पॅनलला विजयश्री मिळाली.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, निवडणुकीचे गांभीर्य ओळखून उमेदवारांचे मनोबल व हिंमत अबाधित असावी याकरीता माझ्या आईला उमेदवारी देण्यात आली होती.
या सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर नवीन युवा चेहरे बसवून रवि शिंदे यांनी युवकांना संदेश दिला आहे की, संविधानाच्या मार्गाने व लोकशाही पूरक हेतूने विनम्र होवून व प्रामाणिक राहून काम करणाऱ्या होतकरू युवकांनी राजकारणात प्रवेश करावा. व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकहिताकरीता काबीज कराव्या, त्यासाठी सदैव मी सोबत राहीन.
शेवटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा वापर हा सभासदांच्या हिताकरीता करावा. पदाचा उन्माद करू नये, असे म्हणून त्यांना रवि शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे