गडचिरोली:- कोरोनासह विविध संकटामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखविली आहे.२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी वारा, गारपीटीसह मोठा अवकाळी पाऊस झाल्याने तालुका मुख्यालयसह इतरही गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यातील अनेक लोकं शेती आधारित व्यवसायावर अवलंबून आहेत. अशातच परिसरात मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हानी पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, कोसळलेल्या घरांचे व आदी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात निर्देश अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रशासनाला दिले.
२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटीसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,अनेक नागरिकांचे घरे कोसळली, तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अवकाळीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तात्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
एवढेच नव्हे तर तालुक्यातील कुठल्याही गावात एकही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले.यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम,तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी उपस्थित होते.
प्रत्यक्ष भेट घेऊन नुकसानग्रस्तांसोबत साधला संवाद
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने अनेकांचे नुकसान केले. याची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तालुक्यातील विविध गावांत प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानग्रस्तांना विषयी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. व त्यांना धीर दिले. स्थानिक नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागात सुद्धा त्यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.