सह्याद्री न्युज नेटवर्क
देसाईगंज :- मंगळवारपासून देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असून वाहतूकीस अडथळा होत असलेल्या बस स्थानक ते मच्छीमार्केट या रस्त्यावर शहरातील दिग्गजांनी अतिरिक्त जागेवर अतिक्रमण केल्याने कुठल्याही दबावाला बळी न पडता नगर परिषदेने अतिक्रमण काढल्याने रस्त्यालगत बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण करणारे चांगलेच धास्तावले आहेत.
मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांच्या नेतृत्वात २६ मे ला अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा बस स्थानक ते मच्छीमार्केट रस्त्यावरील असलेल्या अतिक्रमणाकडे सकाळी १० वाजता पासून वळविला होता. या मार्गावरील शहरातील दिग्गजांचे व्यावसायिक प्रयोजनार्थ इमारती असून अतिरिक्त जागेवर अतिक्रमण करून वाहतूकीला अडथळा निर्माण करित असल्याने नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी सुरूवात केली.
या दरम्यान काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बड्या राजकीय नेत्यांना फोन करून मुख्याधिकाऱ्यावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र या दबावाला न जुमानता बिनधास्त अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेकांचे अतिक्रमण काढले. परंतु आज ज्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सुरूवात केली, त्या रस्त्यावर अनेक दिग्गजांनी अतिरिक्त जागेवर अतिक्रमण करून वाहतूकीला अडथळा निर्माण करित होते. ते अतिक्रमण काढण्यात नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा खरंच काढतील की अभयदान देतात याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या होत्या.
परंतु अतिक्रमण काढताना काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी वाद निर्माण झाला परंतु मुख्याधिकारी अतिक्रमण काढण्यात यशस्वी झाले. नगर परिषद शापींग सेंटर मधील अतिक्रमण तसेच फवारा चौक ते नगर परिषद कार्यालय मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत नगर परिषद कर्मचारी, पोलिस कर्मचारी होते.
भरोसा तोड दिया
देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिम काल पासून सुरू झाली. यात अनेकांनी रस्त्यावर अतिरिक्त बांधकाम करून अतिक्रमण केलेल्यांची अतिक्रमण तोडण्यात आले. यात एका इमारतीचे नाव भरोसा होते. या इमारतीच्या पाय-या वर बुलडोझर फिरवून तोडण्यात आले. यावर शहरात आज भरोसा तोड दिया हे वाक्य मोठ्या चवीने बोलले जात आहे….