चंद्रपूर :- कडक उन्हाळा, भीषण पाणी टंचाई तसेच वन्यप्राण्यांचे हल्ले याबाबींचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर जिल्हयातील कोणत्याही ग्रामपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेचे विज कनेक्शन कापू नये तसेच स्ट्रीट लाईट्सचे पैसे शासनाने वित्त आयोगाच्या निधीतून अदा करावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील काही ग्रामपंचायतींना नळ पाणी पुरवठा योजनांचे विज कनेक्शन तसेच स्ट्रीट लाईट्सच्या थकीत बिलापोटी कनेक्शन कापण्याच्या नोटीस प्राप्त झाल्या आहे. चंद्रपूर जिल्हा विज उत्पादक जिल्हा आहे. जिल्हयातील नागरिक मोठया प्रमाणावर प्रदुषणाचा सामना करीत आहे. त्यामुळे विविध आजारांना त्यांना समोरे जावे लागत आहे. वे.को.लि. च्या कोळसा खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे जिल्हयातील कोणत्याही ग्रामपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कापू नये अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात वन्य प्राण्यांचा वावर मोठया प्रमाणावर आहे. मानव वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणसे दगावत आहेत. अशा परिस्थितीत स्ट्रीट लाईट्स च्या थकीत वीज बिलापोटी कनेक्शन कापण्याच्या नोटीस ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट्सचे पैसे सरकार भरेल असे आश्वासन विधानसभेत देण्यात आले आहे. सदर पैसे सरकारने वित्त आयोगाच्या निधीतुन प्रदान करावे असेही आ. सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.