जिवती : अतिदुर्गम व दुर्लक्षित असलेल्या जिवती तालुक्यातील आदिम कोलामांनी परिसरातील जंगलावर कायदेशीर हक्क सांगण्यासाठी सामुहिक वनहक्क दावा सादर केला असून, कोलामांच्या आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावला जावा यासाठी जंगलाचे योग्य व्यवस्थापन व संरक्षण केले जाणार असल्याचे मत ग्राम विकास समितीचे अध्यक्ष नामदेव कोडापे यांनी व्यक्त केले आहे.
जिवती तालुक्यातील आदिम कोलाम समुदाय अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचे जीवन जगत असून, कोलाम वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी सुविधांची कमतरता आहे. या समुदायास विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन ही संस्था कसोशीने प्रयत्न करत आहे. कोलामांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत आहे. संस्थेच्या प्रयत्नाने अनेक दुर्लक्षित कोलामगुड्यांना रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आता कोलामांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने कोलाम गुड्यालगतच्या जंगलावर कोलामांचे कायदेशीर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी संस्था कसोशीने प्रयत्न करत आहे.
खडकी, रायपूर व कलीगुडा या तीन गावांना लागून असलेल्या सुमारे एक हजार ऐंशी चौरस हेक्टर वन जमीनीवर कोलामांनी दावा सादर केला आहे. यातून बांबू लागवड व विक्री यासह मोहफुल गोळा करणे, तेंदूपत्ता विक्री व अन्य वनोपजावर कोलामांचे अधिकार प्रस्थापित होऊन यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे साधन निर्माण होईल, असा आशावाद कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी व्यक्त केला आहे.
अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ नुसार खडकी रायपूर आणि कलीगुडा येथील सर्व्हे नंबर ५७,२०,१० मधील १ हजार ८८ चौरस हेक्टर क्षेत्रफळावर कोलामांनी तहसीलदार, जिवती यांचेकडे दावा सादर केला आहे. यावेळी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक चटप, रायपूर ग्राम विकास समितीचे अध्यक्ष नामदेव कोडापे, सचिव देवू कोडापे, खडकी ग्राम विकास समितीचे सचिव भिमराव कोडापे, आनंदराव मडावी, झाडू मडावी व अन्य कोलाम बांधव उपस्थित होते.