कोरची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक व द्वेषपूर्ण फेसबुक पोस्ट करणारी केतकी चितळे हिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरची तहसील अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये यांच्या नेतृत्वाखाली कोरची पोलीस ठाण्यात १७ में मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने देशाचे नेते, शरद पवार यांना उद्देशून अतिशय खालच्या पातळीची फेसबुक पोस्ट टाकली आहे. या पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांची अवहेलना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच पोस्ट टाकताना सुरुवातीला तुकाराम महाराजांचाही अपमान केला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाचा अपमान करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
केतकी चितळे सारख्या मूर्ख व्यक्तीने भविष्यात असे कोणतेही कृत्य करू नये म्हणून त्यांचे फेसबुक पेज, ट्विटर, इन्स्टाग्राम यासह सर्व अकाउंट कायमचे ब्लॉक करावेत. सायबर सेलने त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत जेणेकरून भविष्यात अशा पोस्ट टाकताना त्याचा शंभर वेळा विचार होईल. तसेच संबंधित पोलीस विभागाने केतकीचे मानसिक संतुलन तपासून तिच्यावर तातडीने मानसिक उपचार करावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
कोरची पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक आशावरी शेडगे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी महिला आघाडी तहसील अध्यक्ष गिरजा कोरेटी, माजी उपसरपंच रामनाथ कोरचा, अपर्णा साखरे, सुनील कुमरे, राजू भैसारे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.