राजुरा : प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजे आरटीओ यांची सर्व सामान्य नागरिकांमध्ये वेगळी ओळख, वाहनासमोर आले की मनात धास्ती शिरत असून वाहन चालवीत असताना काही नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे दंडाची पावती चालकाच्या हातात मिळणार हे निश्चित. मात्र रस्त्यावर उभे असलेले क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक करणारे अनेक ट्रक असताना चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाही न करता पळून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत आणणार असल्याचा बहाणा करीत पळ काढल्याने त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी त्या अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्राप्त माहितीनुसार राजुरा-रामपूर-गोवरी रस्त्याचे बांधकाम मागील अनेक महिन्यापासून संथ गतीने सुरु आहे. या मार्गावरून सुरू असलेली जड वाहतूक व यामुळे रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीच्या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी सरपंच वंदना गौरकर यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता रामपूर बस स्थानक जवळील परिसरात रस्त्यावरुन सुरू असलेली जड वाहतूक रोखली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांच्या रांगा लागलेल्या होत्या. याठिकाणी वृत्त संकलन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांना सास्ती-रामपूर टी-पॉईंटवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे वाहन उभे असताना दिसले. यावेळी या वाहनाचे चालक लगतच्या एका कोळसा भरून असलेल्या ट्रकमध्ये चढून वाहनाचे कागदपत्र पाहत होते मात्र ट्रक चालक नसल्याने यांना काहीच मिळाले नाही. वाहन चालकाच्या सांगण्यानुसार त्या वाहनात बसून असलेले हटवार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्रकारांनी याच मार्गावर शंभर मीटर अंतरावर क्षमतेपेक्षा जास्त वजन कोळसा भरून उभ्या असलेल्या ट्रकांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यासंबंधी माहिती दिली मात्र संबंधित अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी समोर उभे असून त्यांना घेऊन येतो म्हणून पळून गेले. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या अनेक नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा हा संशयास्पद खेळ प्रत्यक्ष पाहायला मिळला असून या प्रकाराबदद्दल उपस्थित नागरिक रोष व्यक्त करीत असून जड वाहतुकीला याच अधिकाऱ्यांचा पाठींबा असल्याचे यातून सिद्ध होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
एरव्ही छोट्या छोट्या कारणास्थव आडमार्गाने जाऊन वाहन चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ट्रान्सपोर्ट मालकांचे ट्रक क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहतूक करीत असल्याची माहिती पत्रकारांनी दिल्यानंतर छुप्या मार्गाने पळ काढण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे.