वरोरा (राकेश नवघरे): एरव्ही वाढदिवस म्हटलं की मित्रांचा गोतावळा , मोठा डामडौल ,बॅनरबाजी, मटणाचा बेत आणि गाजावाजा करुन पैशाची उधळपट्टी करण्याचे फॅड सगळीकडे दिसते. मात्र याला अपवाद ठरले ते येथील नामवंत व्यवसायिक योगेश डोंगरवार. “एकमेका सहाय्य करु, अवघे धरू सुपंथ” असा संदेश देत योगेश डोंगरवार यांनी एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
वाढदिवस म्हटलं की मोठा डामडौल पहावयास मिळतो . कुठे फटाक्यांची आतिषबाजी तर कुठे किलोकिलोचे केक , मित्राच्या आग्रहास्तव मटणाचा बेत अन् दारूच्या नशेत झिंगाट होवून डिजेच्या तालावर भाईचा बर्थडे गाण्यांचा धांगडधिंगा . सेलिब्रेशनच्या हट्टापायी हजारो रुपयांची उधळपट्टी हा प्रकार सध्या सगळीकडे पाहायला मिळतो .मात्र याला अपवाद ठरला तो वरोरा येथील एक वाढदिवस.एका सामाजिक कार्यकर्त्याने शहरालगत असलेल्या आनंदवन या जग प्रख्यात संस्थेत भेट देवून येथील अंध ,मूकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची लाहीलाही बघता मजबूत व टिकावू गार पाण्याची बाटली व अनेक प्रकारचे खाऊ अशी किट वाटप करून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे .योगेश डोंगरवार हे नाव शहरात तथा तालुक्यांतील सामाजिक क्षेत्रात सुपरिचित आहे . त्यांच्या सामाजिक कार्यामुळे . एक यशस्वी व्यावसायिक असून ते रोटरी क्लब , वरोरा व्यापारी मंडळ , जय भारतीय क्लब , गांधी उद्यान योग मंडळ अशा अनेक सामाजिक संस्थेत सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारीही आहेत. वरोरा शहरातली सामाजिक आणि धार्मिक कार्यात डोंगरवार हे आडनाव मोठया सन्मानाने घेतले जाते . वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा परिवाराचा मोठा पुत्र म्हणून योगेश डोंगरवार पुढे नेत आहे . बालपणीच सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना आई वडिलांकडून मिळाले . त्याला बगल ते कसे देणार? त्यांनी एका अनोख्या पद्धतीने केलेल्या वाढदिवसाचा सेलिब्रेशनवरून. यावेळी त्यांच्या पत्नी , अमोल मुथा, नितेश जयस्वाल , स्वप्नील नरडे, मयुर ढोले , पंकज गहुकर , गोलू नगराळे तसेच आनंदवन येथील कार्यकर्ते उपस्थीत होते .