गडचिरोली: महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव ३१ ऑक्टोबर रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने तालुका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांमध्ये हालचाली वाढल्या असून, पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षकांना ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर या दोन दिवसांत मुख्यालयी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, मुख्य सचिवांच्या दौऱ्याचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने या दौऱ्याबाबत प्रशासकीय वर्तुळासह सीमावर्ती भागातही चर्चांना उधाण आले आहे.
तुमडीहेट्टी बॅरेजच्या चर्चेनंतर दौरा कशासाठी?
विशेष म्हणजे, नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तुमडीहेट्टी बॅरेज प्रकल्पाच्या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्राणहिता नदीवरील या प्रकल्पाचा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाशी जवळचा संबंध असल्याने या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचा सिरोंचा दौरा होत असल्याने या दौऱ्याचा तुमडीहेट्टी प्रकल्पाशी काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेडीगड्डा प्रकल्पाचीही पाहणी होणार का?
दुसरीकडे, सिरोंचा तालुका मुख्यालयाजवळ गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला तेलंगणातील मेडीगड्डा (लक्ष्मी) बॅरेज प्रकल्पही सध्या चर्चेचा विषय आहे. या प्रकल्पाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि संरचनेच्या नुकसानीमुळे तो यापूर्वीच देशपातळीवर चर्चेत आला आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या सिरोंचा दौऱ्यात मेडीगड्डा प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पाहणी होणार का, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
एकीकडे तुमडीहेट्टी बॅरेजचा आंतरराज्यीय विषय, दुसरीकडे मेडीगड्डा प्रकल्पाचा गंभीर प्रश्न आणि त्यातच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचा सिरोंचा दौरा… या सर्व घडामोडींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुख्य सचिवांचा हा दौरा नेमका कोणत्या विषयासाठी आहे?
सीमावर्ती भागातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे की अन्य काही महत्त्वाचा विषय त्यांच्या अजेंड्यावर आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात असून, मुख्य सचिवांच्या दौऱ्याकडे आता केवळ सिरोंचाच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











