गडचिरोली: थकीत वेतनाच्या मागणीसाठी वनमजुरांचे आलापल्ली वनविभाग कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण सहाव्या दिवशीही सुरू आहे. दिवसा आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या मजुरांना रात्री कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून रात्र काढावी लागत आहे. परिसरात साप-विंचूसारख्या विषारी प्राण्यांची भीती असतानाही हे मजूर उघड्यावर उपोषण करत असून, त्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.
आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या तीन वनविभागांतील हंगामी मजूर, चौकीदार, गटबांधणी व मोजमाप कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने मजुरांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे संकट उभे ठाकले आहे. घरातील कुटुंबीयांना सोडून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या या मजुरांना आर्थिक अडचणींसोबतच थंडी आणि असुरक्षित वातावरणाचाही सामना करावा लागत आहे.
थकीत वेतन तातडीने अदा करावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मात्र, सहा दिवस उलटूनही मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने मजुरांमध्ये नाराजी आहे. रात्रीच्या वेळी उपोषणकर्त्यांची परिस्थिती जाणून घेतली असता, कडाक्याच्या थंडीत शेकोटीच्या आधाराने रात्र काढावी लागत असल्याचे चित्र समोर आले. हक्काच्या वेतनासाठी जीव धोक्यात घालून आंदोलन करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.
आता तरी संबंधित प्रशासन या वनमजुरांच्या मागण्यांची दखल घेऊन थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे आंदोलकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.













