चंद्रपूर: गणेशोत्सव २०२६ निमित्त सामाजिक सलोखा, शांतता आणि सर्वधर्मसमभावासाठी सातत्याने कार्य करणारे जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा माजी सभापती वरोरा शेख जैरुदीन छोटूभाई यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
शेख जैरुदीन छोटूभाई हे मागील अनेक वर्षांपासून जिल्हा शांतता समितीच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. विविध सण-उत्सवांच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी ते सातत्याने पुढाकार घेतात.
गणेश विसर्जनाच्या वेळी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची परंपरा त्यांच्या माध्यमातून जोपासली जात आहे. या उपक्रमातून सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकता आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देण्याचे कार्य केले जाते.
या सामाजिक कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने छोटूभाई यांचा करण्यात आलेला सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पावती मानली जात आहे. सन्मानामुळे सामाजिक सलोख्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.












