चंद्रपूर : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेने क्षेत्रीय पाहणीला सुरुवात केली आहे. अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चंद्रपूर तालुक्यातील देवाडा व नागाळा (सी.) येथे भेट देऊन ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या पीक पंचनाम्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.
शेतपिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद होण्यासाठी क्षेत्रीय परिस्थिती अचूकपणे नोंदविणे आवश्यक असल्याचे डॉ. व्यवहारे यांनी सांगितले. पीक पंचनामे आणि ई-पीक पाहणीचे काम तातडीने व प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कृषी, महसूल आणि ग्राम प्रशासन विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने समन्वयाने तसेच संवेदनशीलपणे काम करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष नोंद करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.देवाडा येथील शेतकरी जयराम मारुती पिपरे यांच्या गट क्रमांक १४३ मधील कापूस पिकाची डीसीएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात आली. यावेळी पिकाची सद्यस्थिती तसेच कमी पर्जन्यमानाचा झालेला परिणाम याची नोंद घेण्यात आली.नागाळा (सी.) येथील शेतकरी किसन वैद्य यांच्या शेतातील कापूस, धान आणि भाजीपाला पिकांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती शेतकऱ्याकडून घेण्यात आली.कमी पावसामुळे कापूस पिकामध्ये फुलगळ व पातगळ वाढली असून बोंडांची संख्याही कमी झाल्याचे पाहणीत आढळून आले. परिणामी कापसाच्या उत्पादकतेत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. धान पिकाची वाढही खुंटलेली दिसून आली. त्याचबरोबर भाजीपाला, तूर आणि सोयाबीनच्या उत्पादकतेवरही कमी पर्जन्यमानाचा परिणाम झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ई-पीक पाहणी आणि पीक पंचनाम्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची स्थिती तपासावी, नुकसानीची अचूक नोंद करावी आणि पंचनाम्याचे काम विलंब न करता पूर्ण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोलीस पाटील, सर्व्हेअर तसेच संबंधित गावांतील शेतकरी उपस्थित होते.











