कोरची :- गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन कोरची तर्फे १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकूण 147 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरचीचे तहसीलदार सी आर भंडारी, नगरपंचायत उपाध्यक्ष हिरा राऊत,पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेची सुरुवात केली.
सदर स्पर्धकांनी कोरची ते पांढरीगोटा,पांढरीगोटा ते कोरची असे एकूण दहा किलोमीटरचा धाव घेतला यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच यावेडी वैद्यकीय चमूही स्पर्धकांकरिता उपचारासाठी उपस्थित होते. स्पर्धेनंतर पोलीस स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरची पोलीस स्थेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, उद्घाटक तहसीलदार सी आर भंडारी, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दल ०६ धुळे पोलीस निरीक्षक ईश्वर सरदार, समाजसेवक आशिष अग्रवाल, समाजसेवक राहुल अंबादे प्राध्यापक मुरलीधर रुखमोडे पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, नगरसेवक मनोज अग्रवाल अभिजीत निंबेकर हे उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येणारं पप्पू दुलाराम बोगा भूर्यालदंड यांला पाच हजार रोख रक्कम, आकर्षक चषक, गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र तसेच द्वितीय क्रमांकावर येणारं राकेश परसराम शेंडे गुटेकसा याला तीन हजार रोख रक्कम,आकर्षक चषक,गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांकावर धर्मेंद्र एनसिंग हारमे अल्लीटोला याला दोन हजार रोख रक्कम आकर्षक चषक,गोल्ड मेडल व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रकाश रमेश मिरी आणि पुरुषोत्तम शामराव तुलावी यांना प्रत्येकी रोख एक हजार रुपये,मेडल व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अतिदुर्गम भागातील युवकांना क्रीडा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले तसेच यापुढे गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातून युवकाकांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी तहसीलदार सी आर भंडारी यांनी या स्पर्धेत विजयी झालेल्या विजेत्यांना शुभेच्छा देत बाकी स्पर्धकांचे मनोबल वाढविले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व स्पर्धकाकरिता पोलीस स्टेशन मार्फत अल्पोपहार व थंड शीत पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशन कोरची येथील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहकार्य केले.