गडचिरोली: प्राणहिता नदीला पुष्कर योग आल्याने बारा वर्षांच्या कालखंडानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे पुष्कर कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत पुष्कर मेळावा आयोजित असून साधारण पाच लाख भाविक या मेळाव्यात सहभाग नोंदवतील असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.
याचे औचित्य साधून कृषी विभागाने दिनांक 13 ते 15 एप्रिल 2022 दरम्यान कृषी जनजागृती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव कार्यशाळा व कृषी प्रदर्शनी चे आयोजन कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दर्गा जवळ, सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनीचे व कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्टॉलचे तसेच या निमित्त आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे व अहेरी उपविभागाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे हस्ते दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता झाले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच इतर मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे उद्घाटन क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने मान्यवरांनी केले. मान्यवरांनी यावेळी इफको नॅनो युरिया , पी एम एफ एम ई घडी पत्रिकेचे, ज्वारी पासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ या पुस्तिकेचे विमोचन केले. यावेळी मान्यवरांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान विषयक ठिबक सिंचन संच,नॅनो युरिया, विद्राव्य खतांचे, आधुनिक बियाण्यांचे, कृषी अवजारांचे, कृषी विभागाच्या स्टॉलवर प्रदर्शित केलेल्या विविध योजनांची व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी उत्पादनांच्या नमुन्यांची माहिती मान्यवरांनी घेतली पालकमंत्री महोदयांनी सर्व शेतकऱ्यांना प्रदर्शनीचा लाभ घेण्याबाबत आवाहन करून या निमित्त शुभेच्छा दिल्या. महिला बचत गटाद्वारे आयोजित कृषी उत्पादनांच्या स्टॉलला भेटी देऊन उत्पादित वस्तूंची पाहणी केली. यावेळी ट्रॅक्टर व कम्बाईन हार्वेस्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्याला पालकमंत्री महोदयांच्या हस्ते चावी देऊन कृषी अभियांत्रिकी योजनेतून दिलेल्या लाभाचे प्रतीकात्मक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले.
यावेळी कार्यशाळेमध्ये काजू लागवड एक नवीन संधी तसेच मिरची पिकावरील एकात्मिक खत व कीड व्यवस्थापन या विषयावर लकडे विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तसेच आनंद गंजेवार उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी यांनी मार्गदर्शन केले. कापूस पिकातील गुलाबी बोंड आळी, भात पिकातील तंत्रज्ञान यावर प्रकल्प संचालक आत्मा संदीप कराळे तसेच बुदेवाड विषय विशेषज्ञ यांनी शेतकर्यांना प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमा दरम्यान आमदार देवराव होळी यांनी शेततळे व त्यामधील मत्स्यपालन याचा लाभ देऊन या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत गरज प्रतिपादित केली. तर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचन साठी मुख्यमंत्री शाश्वत योजनेमधून पूरक अनुदान दिल्याने 80 टक्के अनुदानावर ठिबक दिले जात असल्याने नदीचे पाणी पाटाने दिले जात असल्याने जमिनीचा पोत खराब होऊ नये यासाठी की जिल्ह्यातील सर्व मिरची , कापूस उत्पादकांनी ठिबक सिंचन संचाचा लाभ घेण्याबाबत जाहीर आवाहन केले आहे. सिरोंचा तालुक्यात मंचिर्याल रेक पॉइंट वरून खत पुरवठ्याबाबत पाठपुरावा केला जाईल याचे आश्वासन देत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी मेहनती असल्याने रासायनिक खतांचा वापर करताना सेंद्रिय खतांची निर्मिती घरच्या घरी करून त्याचाही वापर संतुलित पोषणासाठी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास अहेरी उपविभागातील कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, परिसरातील शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे, मंडळ कृषी अधिकारी रंजना बोबडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओम प्रकाश लांजेवार, कृषी पर्यवेक्षक रवी मेश्राम, राकेश कोटनाके व सर्व कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेऊन मोलाचे योगदान दिले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान यांनी केले