गडचिरोली: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक केवळ औपचारिक न राहता आता नियमित आढावा बैठका घेऊन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासली जाईल. तसेच तीन ते पाच महिन्यांनी अचानक तपासणी करून सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत त्यांनी शाळा, परिवहन विभाग आणि पालकांनी समन्वयाने काम करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
नव्या नियमांचा शॉर्टकट
सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन अनिवार्य.चालक, वाहक, क्लीनर व महिला कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक.चालकाला किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.लहान विद्यार्थी व मुलींच्या शाळांच्या वाहनात महिला कर्मचारी आवश्यक.बसचा वेग ताशी ४० किमीपेक्षा जास्त नसावा.फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्ट एड, सीट बेल्ट, इमर्जन्सी दरवाजा अनिवार्य.बसचा रंग पिवळा आणि २० वर्षांपेक्षा जुनी बस वापरता येणार नाही.वर्षातून किमान २ ते ३ वेळा मॉक ड्रिल घेणे बंधनकारक
बैठकीत शाळा परिसरात स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, बॅरिकेड्स उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई, अल्कोहोल चाचणी आणि परवाना रद्द करण्याची शिफारस करण्याचे निर्देशही देण्यात आले.
शाळा प्रतिनिधींनी एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्या, शाळांसमोरील भरधाव वाहतूक, राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे आणि स्पीड ब्रेकरच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
स्कूल बस सुरक्षिततेबाबत सूचना किंवा तक्रारींसाठी परिवहन विभागाने ९४२१००४१३३ हा हेल्पलाइन व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.













