गडचिरोली: जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू वाहतूक व विक्रीवर गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 5 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत फोर्ड इकोस्पोर्ट्स चारचाकीसह विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, तेलंगणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली पोलिसांनी 19 जुलै रोजी संयुक्त कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे रेपनपल्ली परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी डीएल 2 एफबीपी 0045 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट्स संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता वाहनातून विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 89 प्लास्टिक बाटल्या (किंमत 89 हजार रुपये) तसेच किंगफिशर स्ट्राँगच्या 750 मिलीच्या 31 काचेच्या बाटल्या (किंमत 9 हजार 300 रुपये) जप्त करण्यात आल्या. याशिवाय अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट्स (अंदाजे किंमत 5 लाख रुपये) जप्त करण्यात आली. असा एकूण 5 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी सुरेंदर शंकर भुक्या (नायक) (वय 38, रा. सुभाषनगर, मंचेरियाल, तेलंगणा) आणि संदीप स्वामी गुराल्ला (वय 31, रा. करमपल्ली, चेन्नूर, मंचेरियाल, तेलंगणा) या दोघांविरुद्ध रेपनपल्ली उपपोस्टे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्लीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.













