गडचिरोली: जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजात सातत्य व कार्यक्षमता राखण्यासाठी महत्त्वाचा आदेश जारी केला असून, सिरोंचा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार नायब तहसीलदार आर. पी. सिडाम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे सिरोंचा नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आर. पी. सिडाम यांनी मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारताच नगरपंचायत कार्यालयात त्यांचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत नगरपंचायतीच्या विकासकामांना अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कोरची नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार धनोरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रितीश मगरे यांच्याकडे, तर आरमोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार गडचिरोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिक्त मुख्याधिकारी पदांमुळे प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, संबंधित अधिकारी तात्काळ प्रभावाने जबाबदारी पार पाडणार आहेत.













