महेश गुंडेटीवार/अहेरी:राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी होणार होती. गडचिरोली जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर एकूण ९ हजार २५९ परीक्षार्थी परीक्षेला बसणार होते. मात्र, ऐनवेळी पेपर फुटल्याची माहिती समोर आल्याने हजारो उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न काही काळासाठी भंगले. केवळ परीक्षा पुढे ढकलली गेली नाही, तर उमेदवारांसह प्रशासनालाही मोठा मानसिक, आर्थिक आणि नियोजनाचा फटका बसला.
जिल्ह्यात गडचिरोली शहरातील १६ आणि आरमोरी तालुक्यातील ५ अशा एकूण २१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पेपर-१ साठी ३,९८० तर पेपर-२ साठी ५,२७९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी ६७६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांची सज्जता, सुरक्षा व्यवस्था, ओळख पडताळणी, प्रश्नपत्रिकांचे वितरण यासह सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, पेपर फुटीच्या घटनेमुळे प्रशासनाचे सर्व नियोजन एका क्षणात कोलमडले.
या संपूर्ण घटनेचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या दक्षिण भागातील व खास करून सिरोंचा तालुक्यातील परीक्षार्थींना बसला. सिरोंचा ते गडचिरोली हे सुमारे २१० किलोमीटरचे अंतर असल्याने अनेक उमेदवार दोन दिवसांपूर्वीच प्रवासाला निघाले होते. काही उमेदवारांना गडचिरोली तर अनेकांना चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र मिळाले होते. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे प्रवास आधीच अत्यंत खडतर झाला होता. अशा परिस्थितीत रात्रभरचा प्रवास करून अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या दिशेने निघाले असताना पेपर फुटल्याची माहिती मिळाली आणि अनेकांना अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरावे लागले.
यामुळे उमेदवारांचा प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था, भोजन, वाहन भाडे यावर झालेला खर्च वाया गेला. अनेकांनी खासगी वाहन, बस किंवा इतर प्रवासाची व्यवस्था केली होती. काहींनी हॉटेलमध्ये मुक्कामाची बुकिंग केली होती. बेरोजगार तरुणांसाठी हा आर्थिक भार मोठा ठरला. दुसरीकडे, अनेक उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून परीक्षेची तयारी करत होते. परीक्षा अगदी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना ती रद्द झाल्याने त्यांच्यावर मोठा मानसिक ताण आणि नैराश्य आले.
यंदा बेरोजगार उमेदवारांसोबतच जिल्हा परिषद व विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत अनेक शिक्षकही टीईटी देणार होते. इयत्ता १ ते ८ पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी पात्रता अनिवार्य करण्यात आल्याने अनेक विद्यमान शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे या घटनेचा परिणाम केवळ नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांवरच नव्हे, तर सेवेत असलेल्या शिक्षकांवरही झाला.
पेपर फुटीमुळे हजारो उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, गडचिरोली जिल्ह्यातील ९ हजार २५९ परीक्षार्थी या गोंधळाचे थेट बळी ठरले आहेत. उमेदवार आता नव्या परीक्षा तारखेची प्रतीक्षा करत असून, पेपर फुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी तीव्र मागणी उमेदवारांकडून होत आहे.
कर्तव्य सांभाळून अभ्यास;पेपर रद्द झाल्याने शिक्षकही संतप्त
जनगणना, निवडणूक, बीएलओची जबाबदारी, विविध शासकीय प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांचा ताण सांभाळत अनेक विद्यमान शिक्षकांनी टीईटीसाठी मेहनत घेतली होती. मात्र ऐनवेळी पेपर रद्द झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. मानसिक व आर्थिक फटका बसल्याने शिक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.













