अहेरी :पेरमिली वन परिक्षेत्राच्या पुढाकाराने विविध उपक्षेत्रात १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके यांच्या नेतृत्वात ‘वन्यजीव सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कालावधीत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयावरील व्याख्यानं तसेच वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती रॅली घेण्यात आले. वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शालेय विद्यार्थी, वनरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांचे अस्तित्व राखण्यासाठी मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, वन्य प्राण्यांना त्रास न देता त्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन विभागाने “प्रकृतीचे रक्षण, आपले कर्तव्य” हा संदेश देत समाजात पर्यावरणप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
पेरमिली वनपरिक्षेत्र अंतर्गत पेरमिली, कांदोडी बुर्गी, मेडपल्ली, येरमनार, गुरुपल्ली या उपक्षेत्रांचा समावेश असून प्रत्येक उपक्षेत्रात वन्यजीव सप्ताहात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी दुचाकी रॅली काढून जनजागृती करत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नरेश चौके, क्षेत्र सहाय्यक वरखडे, तुम्मे, फाये व वनरक्षक तरेवार, जावडे, मातने, बाकडा, पदा, पारेलवार, मेश्राम आदी कर्मचारी उपस्थित होते.













