मुलचेरा:दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.एटापल्ली तालुकालगत असलेल्या मुलचेरा तालुक्यातील काही गावांत देखील रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. हिवतापमुक्त तालुका करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहे.मात्र,एटापल्ली तालुका लगतच्या गावांमध्ये घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी स्वछता नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.अशीच काही परिस्थिती बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावांत निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत बोलेपल्ली,पुल्लिगुडम,हेटळकसा अशा तीन गावांचा समावेश असून ही गावे अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात.२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४६८ एवढी आहे.सदर ग्रामपंचायत पेसा मध्ये असल्याने आदिवासी उपयोजनेअंतर्गत ५ टक्के थेट निधी मिळतो.हा निधी ग्राम सभेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो.१४ वित्त अयोगातून देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळतो.ज्याचा उपयोग विविध विकास कामांसाठी केला जातो.त्या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्र सरकार कडून विविध योजनांसाठी अनुदान मिळते.एवढेच काय तर जिल्हा परिषदेकडून आणि इतर स्रोतांकडूनही निधी मिळतो.मात्र सदर निधीचा उपयोग कुठे केला जात आहे.याचा थांगपत्ताच लागत नसल्याची ओरड गावकाऱ्यांकडून केला जात आहे.

पेसा निधीतून गावातील पिण्याच्या पाण्याची सोय करणे.रस्ते, गटारे, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे.शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकास करणे.महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी योजना राबवणे.पारंपारिक कला आणि संस्कृतीचे जतन करणे. ग्रामविकासासाठी आवश्यक असणारे इतर कामे करणे तसेच पेसा निधीचा उपयोग ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रात विकासकामे करण्यासाठी आणि स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी होतो.मात्र,बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांतील परिस्थिती बघितल्यास या निधीचा वापर कुठे केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे या तिन्ही गावांत आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
वरिष्ठांच्या सुचनांकडे दुर्लक्ष

एकीकडे तालुक्यातील हिवातापाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन कामाला लागला आहे.तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली.जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील याकडे विशेष लक्ष आहे.गावांत डासांची संख्या वाढल्यास डेंग्यू,मलेरिया, चिकणगुणिया सारख्या आजारांचा धोका निर्माण वाढतो.यासाठी डास प्रतिबंधक फवारणी करण्यासाठी सर्व विभाग एकवटले आहे.स्वतः तहसीलदार चेतन पाटील यांनी आवाहन केले.असे असताना बोलेपल्ली ग्राम पंचायतीचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.













