मुलचेरा: तालुक्यात येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत तब्बल 45 गावांत हिवताप सनियंत्रण करिता डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी देखील फवारणी करून घेऊन आपल्या घरातील आणि परिसरातील डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुलचेराचे तहसीलदार तथा टास्क फोर्सचे तालुका अध्यक्ष चेतन पाटील यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण 68 महसूल गावांचा समावेश असून त्यापैकी तब्बल 45 गावात हिवताप सहनियंत्रण करिता डास प्रतिबंधात्मक फवारणी केले जाणार आहे. त्यासाठी एकूण 4 फवारणी पथक तयार करण्यात आले असून जवळपास 24 कर्मचारी या 45 गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन डास प्रतिबंधात्मक फवारणी करणार आहेत.गावांत डासांची संख्या वाढल्यास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे.
विविध गावातील सर्व प्रभाग, सार्वजनिक ठिकाण, बस स्थानक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय आणि घरांच्या आसपास फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र नागरिकांनी देखील आपल्या घराजवळ पाणी साठू नये, यासाठी दक्षता घ्यावी, डास प्रतिबंधक फवारणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, डास प्रतिबंधक औषधे वापरावी. एवढेच नव्हे तर आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग, तहसील विभाग, गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी फवारणीबाबत प्रत्येक गावात जनजागृती करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात मुणारी देऊन गावकऱ्यांना ही माहिती द्यावी. वेळप्रसंगी फवारणीच्या दिवशी गावात पोलो (पंडुम) पाळणे शक्य झाल्यास ते देखील करावे असे आवाहन टास्क फोर्स चे तालुकाध्यक्ष तथा तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.













