भामरागड: ग्रामपंचायत येचली येथे दिवाबत्ती व पाणीपुरवठा कर्मचारी (वर्ग – ४) या पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत परीक्षेची चौकशी करून ती रद्द करावी आणि पंचायत समिती भामरागड येथे पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
ग्रामपंचायतीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी सदर पदभरतीची जाहिरात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली होती. सात उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मात्र, तब्बल नऊ महिन्यांनंतर १९ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत भवन येचली येथे लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर निवड केलेल्या उमेदवाराला कार्यालयात थांबवून इतर उमेदवारांना ‘अर्ध्या तासात निकाल लागेल’ असे सांगून घरी पाठवण्यात आले. निकाल लावून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आणि विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी घटनास्थळ सोडले, असा गंभीर आरोप तक्रारकर्त्यांनी केला.
तक्रारदारांनी दुसऱ्या दिवशी विस्तार अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची बदली झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच, निवड प्रक्रियेबाबत उत्तरपत्रिका दाखविण्याची मागणी ग्रामसेवकाकडे केली असता ती वारंवार टाळण्यात आली.
तक्रारकर्त्यांचा आरोप आहे की, निवड करण्यात आलेल्या उमेदवाराकडे कोणताही अनुभव नसताना अनुभवाचे पाच गुण देण्यात आले, तसेच अर्ज सादर करताना MSCIT प्रमाणपत्र नसतानाही त्याला पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे पदभरतीत नातेसंबंध, पैशांचा व्यवहार व राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियुक्ती तत्काळ रद्द करावी व फेरपरीक्षा पंचायत समिती भामरागड येथे घेण्यात यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशारा तक्रारदारांनी दिला.
या पत्रकार परिषदेला हरीश येजुलवार, किशोर दुर्गे, महेंद्र येजुलवार, मीनाक्षी बडगेल, आदित्य कुंदाराम आणि विशाल झाडे उपस्थित होते.













