कोरची
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय मानव सुखी व समाधानी जीवन जगू शकत नाही. व्यक्तीने स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करतांना समाजाच्या विकासातही योगदान देणे महत्वाचे असते. त्यादृष्टीने राष्ट्रीय सेवा योजना ही समाजसेवेची प्रेरणा देणारे उत्तम व्यासपीठ आहे, असे मत तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी व्यक्ती केले.
ते बुधवारी वनश्री महाविद्यालय कोरची तर्फे गहानेगाटा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असल्याने त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मोठी संधी उपलब्ध होत असते. या शिबिरातील विद्यार्थी हे सात दिवस गहाणेगाटा गावात निवासी राहणार आहेत. यामुळे ग्रामीण समाजजीवन जवळून समजून घेण्याची व जीवनातील प्रत्यक्ष समस्या समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. याचा उपयोग करून त्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक ०८ मार्च ते १४ मार्च २०२२ पर्यंत गहाणेगाटा तालुका कोरची येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ०९ मार्च २०२२ ला या शिबिराचा उदघाटन समारंभ पार पडला.
या उदघाटन समारंभाचे अध्यक्ष नगरसेवक मनोजभाऊ अग्रवाल सदस्य, महाविद्यालय विकास समिती हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे, सरपंच सावजी बोगा, सत्कारमूर्ती डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, ग्रामपंचायत सदस्या छायाबाई जांभुळकर, पोलीस पाटील भगवानसाय बोगा, मुख्याध्यापक श्रीराम गोटा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ हलामी, तानुरामजी पोरेटी, नारनवरे तलाठी बोरी, ग्रामसभा अध्यक्ष तिलक उईके आदी उपस्थित होते. यावेळी पीएच. डी. पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. प्रदिप चापले यांनी केले तर आभार प्रा. जे. के. विनायक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गहाणेगाटा येथील समस्त ग्रामवासी, वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, सर्व शिबिरार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.