अहेरी:मागील काही दिवसापासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.पूर्व विदर्भातही ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली असून नुकतेच शुक्रवारी नागपूर शहरातील वर्धा रोडवरील एअरपोर्ट हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात पक्षप्रवेश सोहळा रंगला. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.त्यात अहेरीच्या नगराध्यक्ष रोजा करपेत यांचा देखील समावेश आहे. त्यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले आहे.
मागील काही दिवसांपासून अहेरी नगरपंचायत मध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.नुकतेच काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील काही नगरसेवकांनी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनतर डिसेंबर महिन्यात नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविकेने दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देत जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह तब्बल ९ नगरसेवकांना अपात्र घोषित केले होते.त्यानंतर परत स्थगिती मिळाली.नुकतेच विषय समिती सभापती पदाची निवडणुक पार पडली.त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व दिसून आला.गुरुवारी ही निवडणूक संपन्न होत नाही तर नगराध्यक्ष रोजा करपेत यांनी शुक्रवारी शिवबंधन हाती बांधून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
अहेरी नगर पंचायतीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे तत्कालीन नेते अजय कंकडालवार यांच्या गटाची मागील तीन वर्षांपासून सत्ता होती. त्यांनी शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) फुटीर गटाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित केली होती.रोजा करपेत नगराध्यक्ष तर शैलेश पटवर्धन उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. तेंव्हापासून राज नगरीतील अहेरी नगरपंचायतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहेत.
शुक्रवारी नगराध्यक्ष रोजा करपेत यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर गाठले.येथे थाटामाटात संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.
——————————————–
अहेरीच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतला असून शिवसेनेचे नेते किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवसेनेत माझं पक्ष प्रवेश झाला आहे.
-रोजा करपेत,नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरी













