गडचिरोली:-नुकतेच नव्याने रुजू झालेले गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दक्षिण भागाच्या दौऱ्यावर असून त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी अहेरी उपविभागातील भाग पिंजून काढला आहे.त्यांच्या या दौऱ्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांचा अहेरी उपविभागत हा पहिलाच दौरा आहे.सुरुवातीला त्यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्लीच्या आयुष्यमान आरोग्य मंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी येथील अधिकारी कर्मचार्यांशी संवाद साधून आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.औषधी भांडार,विविध कक्ष तसेच परिसराची पाहणी केली.त्यानंतर ते थेट कमलापूर गाठून येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत बांधकामाची पाहणी केली.यावेळी त्यांनी प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी केली.तसेच त्वरित बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर त्यांनी जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,रंगयापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,बामणी येथील आरोग्य पथक तसेच कारसपल्ली उपकेंद्राला भेट दिली.यादरम्यान त्यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी करतानाच रुग्णांशी देखील संवाद साधले.विशेष म्हणजे त्यांनी जिल्ह्याच्या दक्षिण भागात केलेल्या पहिल्याच दौऱ्यात दुर्गम भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच आदी कार्यालयांना भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

त्यांनी केलेल्या पहिल्याच दौऱ्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली असून मुलचेरा ते सिरोंचा पर्यंत सर्वच तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर आले आहेत.













