कोरची
तालुका मुख्यालयापासून 26 किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम, संवेदनशील तसेच मुलभूत सुविधांपासून वंचित अशा मयालघाट येथे शुक्रवारी जि. प. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट दिली. रस्ते, आरोग्य, पाणी, विजेच्या समस्येमुळे नेहमीच चिंतेत असलेले मयालघाट हे गाव गडचिरोली व गोंदिया जिल्हा सीमेला लागून आहे. ‘फुलोरा मुलभूत क्षमता विकसन कार्यक्रम’ अंतर्गत फुलोरा शाळा मयालघाट, अंगणवाडी तसेच गावातील विकासकामांची पाहणी केली. तसेच शाळेची मुलभूत समस्या वर्गखोली दुरुस्ती व नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. पंचायत समिती कोरची चे संवर्ग विकास अधिकारी सतीश टिचकुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी, गडचिरोली जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी विनोद म्हशाखेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भेट झाली.
जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणा तथा मार्गदर्शनाखाली पायाभूत क्षमता व गुणवत्ता विकास कार्यक्रम फुलोरा उपक्रम जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सुरु असून, सदर उपक्रम मयालघाट शाळेत गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे, कोरची केंद्राचे केंद्र प्रमुख हिराजी रामटेके, फुलोरा सुलभक दिलीप नाकाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे दोन्ही शिक्षक जितेंद्र साहाळा व प्रतिभा भेंडारकर हे फुलोरा उपक्रमातील कृतींच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्यक्ष कृती द्वारे विद्यार्थ्यांत रमून विद्यार्थ्यांच्या स्तरांची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमाद्वारे विविध कृती तथा फुलोरा उपक्रमाद्वारे होत असलेले यशस्वी बदल पाहण्याच्या दृष्टीने हि आकस्मिक भेट होती. त्यानंतर अंगणवाडी केंद्र मयालघाट येथे भेट देऊन सकस आहार, बालकांचे आरोग्य तथा विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच पंचायत विभागामार्फत गावात राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तथा विकासकामांची पाहणी केली. यामध्ये विशेषतः जल जीवन योजने अंतर्गत सुरु असलेली नळ पाणी पुरवठा योजना, विहिरी इत्यादी ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
भेटीदरम्यान अंगणवाडी पर्यवेक्षिका चिमूरकर, ग्रा. पं. मुरकुटी चे सरपंच सुमित्रा कोरचा, उपसरपंच राजाराम वट्टी, ग्रामसेवक शेडमाके, फुलोरा सुलभक दिलीप नाकाडे, आशा वर्कर इंदारो कोरचा, धमगाये आशा प्रवर्तक तथा ईतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिलीप नाकाडे, जितेंद्र साहाळा, प्रतिभा भेंडारकर, इंदू कराडे यांनी प्रयत्न केले.