सागर भटपल्लीवार , राजुरा : कोरोना पासून विद्यार्थ्यांच्या आरोग्या विषयी संवेदनशील असलेले प्रशासन मात्र रस्त्यावरील धुळीमूळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असताना मुंग गिळून गप्प का आहे, असा सवाल पालक वर्ग करीत आहे. कोरोनाच्या दीर्घ काळानंतर आता पूर्ण वेळ शाळा सुरू झाली आहे, मात्र रामपूर येथील विद्यार्थ्यांची शाळेत जाणारी वाट पुन्हा बिकट झाल्याने येथील विद्यार्थ्यांना रस्त्यावरील धुळीमुळे जिल्हाधिकारी साहेब आम्हाला धुळीपासून मुक्त कराहो म्हणण्याची वेळ आली आहे. शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात धूळ उडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोना संकटानंतर तीस जानेवारी पासून शहरी व ग्रामीण भागातील ऑफलाईन एक ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून नुकतीच पूर्ण वेळ शाळा सुरू झाली आहे. परीक्षा जवळ येऊ लागल्याने विद्यार्थी व शिक्षक यांना अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागत आहे, मात्र राजुरा शहर लगत असलेल्या रामपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व प्रियदर्शनी विद्यालय येथिल विद्यार्थी दररोज याच मार्गावरून पाचशे मीटर अंतर पायदळ चालत शाळेत ये-जा करीत असते, रस्त्यावर चालणाऱ्या वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुळ उडत असल्याने या धुळीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. याबरोबरच राजुरा-गोवरी-वरोडा या मार्गावरील शिवाजी हायस्कुल गोवरी, जिल्हा परिषद शाळा गोवरी, प्रियदर्शनी विद्यालय साखरी, एकलव्य कन्व्हेन्ट वरोड या शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उडणारा धूळ विद्यार्थ्यांच्या अंगावर येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.
या रस्त्याचे बांधकाम सुरू करणे व दिवसातून तीनवेळा पाणी मारण्यासाठी रामपूर येथील नागरिकांनी दोनदा व गोवरी येथिल नागरिकांनी चारवेळा आंदोलन केले. आंदोलनस्थळी बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी येऊन लवकरच काम सुरू करणार व दिवसातून तीन वेळा धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले मात्र येथील लोकप्रतिनिधीला व बांधकाम विभागाला चपराक देत संबंधित कंत्राटदाराची मुजोरी सुरूच आहे. कधी पाणी मारले जाते तर कधी पाणीच मारत नाही. यामुळे रस्त्यालगत वस्तीतील घरांमध्ये धुळीचे थर साचत असून नागरिकांच्या व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
स्थानिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता संबंधित कंत्राटदारांना व बांधकाम विभागाला सक्तीची ताकीत देत धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी सतत रस्त्यावर पाण्याचा फवारा करणे व लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावे अन्यथा आम्ही सर्व विद्यार्थी रस्त्यावर बसू असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
इन्फो : परीक्षेची वेळ जवळ येत असल्याने धुळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य ढासळत चालले असल्याने ऐन परीक्षेच्या काळात प्रकृतीत बिघाड आल्यास विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिल्यास जबाबदार कोण, रस्त्यालगतच्या घरांमध्ये धुळीचे थर साचत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मन होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रस्त्याच्या बांधकामकडे दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदारांची मुजोरी सुरू असून बांधकाम विभाग कंत्राटदाराचे लाड का करीत आहे.