गोंडपिंपरी – (सुरज माडूरवार)
गुप्त माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता शिवाजी चौकात गस्त घालत असताना जनावरांची तस्करी करणारा ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत एक आरोपी अटकेत घेतला असून ट्रकमधील ३७ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे.
गडचिरोली वरून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तिगोटे, खुशाल टेकाम, आणि सचिन मोहुर्ले यांनी गस्तीदरम्यान या ट्रकवर कारवाई केली.
या कारवाईत अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले गोवंश चंद्रपूर प्यार फाऊंडेशनकडे संगोपनासाठी पाठविण्यात आले. आरोपी नासिर शेख बल्लारपूर याला ताब्यात घेत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार हत्तिगोटे करत आहेत.