अहेरी: स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत मागील काही वर्षात जिल्ह्यातील गावागावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शासनाने अतिशय गंभीरतेने यात लक्ष घातले आहे. त्यामुळे गावागावात काही प्रमाणात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी आणखी अनेक गावात अद्यापही घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे या विषयावर आणखी काम होणे गरजेचे आहे. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.
सीआरपीएफच्या ९ आणि ३७ बटालियन तर्फे शनिवारी (१४ सप्टेंबर) रोजी अहेरी बस स्थानक परिसरात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडट शंभू कुमार, सीआरपीएफ बटालियन ३७ चे कार्यकारी कमांडंट सुजित कुमार (द्वितीय कमान अधिकारी) सीआरपीएफचे अधिकारी डॉ.दीप शेखर मोहन, कमांडंट योगेंद्र ढाकोळे (द्वितीय कमान अधिकारी), शिव कुमार राव,चंचल परवाना, कमलेश इंदोर तसेच अहेरी आगाराचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानांतर्गत स्वच्छ आरोग्य व नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
सीआरपीएफ तर्फे १४ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविण्यात येणार असून या दरम्यान अहेरी परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.दरम्यान यास्तही अहेरी बस स्थानक परिसर ते गांधी चौक पर्यंत भव्य रॅली काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी सीआरपीएफ बटालियन ९ आणि ३७ चे अधिकाऱ्यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे हे पटवून दिले.
तसेच नागरिकांनी त्यांचे घर, कर्मचाऱ्यांनी कार्यालय तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.