मूल – तालुक्यातील फिस्कुटी येथील तय्यूब पठाण यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली. आज (31 ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता घडलेल्या या घटनेत शेजारील अशोक रघुनाथ मोहुर्ले (५२) व त्यांची पत्नी लता अशोक मोहुर्ले घराच्या भिंतीखाली दबले गेले. घरात काम करत असताना भिंत कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली.
भिंत कोसल्याच्या आवाजाने आरडाओरडा झाल्यावर गावकऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर दबलेल्यांना बाहेर काढले. अशोक मोहुर्ले यांना गंभीर जखमांमुळे उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. लता मोहुर्ले यांना गंभीर जखमांमुळे उपजिल्हा रुग्णालय मूल येथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच नितीन गुरुनुले यांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे आणि पावसाळ्याच्या काळात अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून सुरक्षितता कशी राखावी यावर लक्ष देणे आवश्यक आहे.