अहेरी:मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रेतेसह दारू वाहतुकदारांवर कारवाईचा धडाका सुरू असून अहेरी पोलीस आता ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
अहेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे एका चारचाकी वाहनाची झडती घेतले असता मारुती सुझुकी कंपनीच्या एम एच-४३ ए एन ५२०० क्रमांकाच्या वाहनातून अवैध देशी,विदेशी दारू वाहतूक होत असल्याचे आढळले. पोलिसांनी जप्त केलेल्या देशी,विदेशी दारूची किंमत १ लाख १० हजार असून चारचाकी वाहनाची किंमत २ लाख ५० हजार असे तब्बल ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई अहेरीचे ठाणेदार दशरथ वाघमोडे आणि त्यांच्या चमूने भुजंगरावपेठा जवळ २९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास केली.याप्रसंगी अहेरी पोलिसांनी श्रीनिवास शंकर नरहरी (३५),अतिक अहमद शेख (३२) दोघेही राहणार बाबूपेठ,चंद्रपूर असे दोन आरोपी,वाहन चालकाला अटक केली आहे.तर आणखी एक आरोपीचा शोध सुरू आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी अहेरी पोलिसांनी आलापल्ली शहरात गोवंश तस्करी करणाऱ्यांना अटक केली त्यानंतर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आणि आता परत भुजंगरावपेठा जवळपास अवैध दारुसह वाहतूक करणाऱ्यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार दशरथ मघमोडे यांनी दिली आहे.अहेरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि अवैध दारू वाहतुकदारांची झोप उडाली आहे.पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.