अहेरी: नुकतेच एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या आहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तत्कालीन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते,विद्यमान काँग्रेसचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती.मात्र,अवघ्या काही कालावधीतच त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावरच अविश्वास ठराव पारित करण्यात आला असून कायापालट होणार हे निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांचा या परिसरात असलेला सहकार क्षेत्रातील दबदबा कमी झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेला वजनही कमी झाला आहे. यामुळे कंकडालवार यांना खूप मोठा झटका बसला आहे.
एप्रिल २०२३ मध्ये अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली होती. १८ सदस्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर कंकडालवार यांनी स्वतः दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी १० विरुद्ध ७ अशी एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती. दरम्यान त्यांनी एका ठिकाणी राजीनामा दिला होता. आता येथे १७ सदस्य संख्या होती. सत्ता स्थापन करतेवेळेस १० विरुद्ध ७ अशी स्थिती होती. मात्र, अवघ्या काही कालावधीतच त्यांच्या सभापती पदावर नाराज असलेल्या सदस्यांनी अविश्वास ठराव पारित करत आता १२ विरुद्ध ५ अशी स्थिती निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या गटाकडून निवडून आलेले रवींद्रबाबा आत्राम (उपसभापती), राकेश कुळमेथे, अनिल कर्मकार, मलुबाई ईश्टाम, सैनु आत्राम या सदस्यांनी त्यांना नाकारले असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या गटात सामील झाले आहे. यामुळे एकंदरीत काँग्रेसचे नेते तथा माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली आहे.
विशेष म्हणजे अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजय कंकडालवार यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने नाराज सदस्यांनी त्यांचाच गेम केला, अशी चर्चा अहेरी राजनगरीत सुरू आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.