अहेरी: शासकीय मध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पेरमिली येथे नुकतेच प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ॲड. बोधी रामटेके प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. लंडन येथे कायद्याचे उच्च शिक्षण घेणारे, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक बोधी रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महत्व पटवून देत, त्या संदर्भातील संधीबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
‘आदिवासी समाजावर होत असलेल्या सामाजिक, संस्कृतीक व आर्थिक अन्याय दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावे. स्वतः सक्षम होत, समाजावर होणाऱ्या शोषणाविरोधात आवाज उठविण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा‘ असे मत ॲड. बोधी यांनी व्यक्त केले. कुठलाही न्यूनगंड न बाळगता व स्वतःबाबत सहानुभूती निर्माण न करता स्वतःतील ‘आदिवासीयता’ जागृत ठेवत निर्भीडपणे शिक्षण घ्या असे देखील त्यांनी सांगितले.
आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आश्रम शाळेचे प्राचार्य मा. माऊलीकर व प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वाघाडे व शिक्षक मा. भोये उपस्थित होते. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठात जावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रामुख्याने कायद्याच्या क्षेत्रात विद्यार्थी जावेत यासाठी त्यांची स्पर्धात्मक परीक्षेची तयारी देखील करवून घेतली जात आहे’ असे प्राचार्य माऊलीकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. चिमूडकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक मा. देशमुख, मा. सयाम मॅडम, मा. शेख, मा. मेडी, मा. वाघाडे मॅडम, मा. मेश्राम मॅडम, मा. मडावी, मा. दासगाये, मा. शेडमाके मॅडम आणि मा. जूमडे मॅडम यांनी सहकार्य केले.