गोंडपिपरी :– धाबा-कोंडाणा-चेकसोमनपल्ली,सूपगाव-नंदवर्धन-शिवणी-पानोरा, भंगाराम तळोधी-फूलोरा हेटी-चेकपिपरी, वढोली-चेकलिखितवाढा या ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. शुक्रवारी नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत अमर बोडलावार यांनी या ठिकाणी पावसामुळे झालेल्या रस्त्यांच्या गंभीर स्थितीबद्दल मंत्रीमहोदयांना माहिती दिली.
या भागातील रस्त्यांची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्या-येण्यावर आणि सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासावर गंभीर परिणाम करत आहे. अमर बोडलावार यांनी ही समस्या ना .सुधीर नमुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, मंत्रीमहोदयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर रस्त्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.