वैजापूर :- तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे रवाना झालेली लालपरी बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आणि वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. ही घटना सुमारे २ वाजता घडली, ज्यामुळे चौकात मोठी गर्दी जमली.
बस बंद पडल्याने प्रवाशांनी बस खाली उतरून गाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण बस पुढे होईना किंवा मागेही जाईना. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आणि ते राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेसंदर्भात चिडचिड करू लागले. प्रवाशांनी जुनी बसेस खराब अवस्थेत असल्याने अनेक वेळा त्यांना असा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले.
चर्चा सुरू असताना प्रवाशांनी जुन्या बसेस दुरुस्त करण्याची किंवा नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नाहीतर लोक बसने प्रवास करणे बंद करतील आणि महामंडळावर वाईट परिणाम होईल, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.
शेवटी, तेथून जाणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरच्या मदतीने बसला धक्का दिला, ज्यामुळे बस पुनः चालू झाली आणि वाहतूक व्यवस्थित सुरू झाली.