चिमूर प्रतिनिधी :- वारंवार तक्रार व विनंती करूनही एसटी बस थांबत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न निर्माण झालेला होता. अखेर या विद्यार्थ्यांच्या मदतीला सरपंच साईश वारजूकर व त्यांची चमू त्यांच्या मदतीला धावत आली.
चिमूर तालुक्यातील सावरगाव मालेवाडा येथील जवळपास ४० विद्यार्थी दररोज चिमूर येथे वेगवेगळ्या शाळेत शिक्षणासाठी जात असतात. त्यांना जाण्यासाठी सकाळी 11 व साडेअकरा वाजताच्या दोन बसेस आहे. परंतु ह्या दोन्ही बसेस मालेवाडा बस स्थानकावर थांबत नव्हत्या. त्यामुळे मालेवाडा व सावरगाव येथील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नव्हते. ज्यांच्या घरी वाहन आहे त्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत सोडून देत होते तर काही विद्यार्थी लिफ्ट मागून शाळेत जात होते. यात विद्यार्थ्यांचे बरेवाईट घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बस थांबत नसल्याची तक्रार एसटी आगार प्रमुखांनाही केली होती. परंतु आगार प्रमुखांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. शाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्याचा कालावधी झालेला असून दोन महिन्याच्या कालावधीत बस मालेवाडा बस स्थानक वर थांबत नसल्याने बरेच विद्यार्थी बस स्थानकावरून पुन्हा घरी परत जात होते. याची माहिती स्थानिक लोकांनी युवक काँग्रेसल दिली. या मागणीची दखल घेत शंकरपूर येथील सरपंच साईश वारजूकर यांनी शुक्रवारी दहा वाजता पासूनच मालेवाडा बस स्थानकावर ठान मांडून उभे राहिले. अकरा वाजताची बस येताच त्या बसच्या समोर उभे राहून बस थांबविली. व सर्व विद्यार्थ्यांना बस मध्ये बसविले. साडेअकराचे बसमध्येही रस्त्यावर आडवे होऊन बस थांबवण्यात आली. व त्याही बस मध्ये विद्यार्थी बसविण्यात आले. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी आगार प्रमुखाला रोज बस थांबवण्याची निवेदन देण्यात आल्या नंतर जर मालेवाडा बस स्थानकावर बस थांबली नाही तरी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा साईश वारजुकर, नागेश चट्टे ,श्रीकांत गेडाम, साजील शेख, आशिष चौधरी, सौरभ जयस्वाल,अक्षय बावनकर, प्रियांशू वाढई , अमन मेश्राम, या युवकांनी दिलेला आहे.