चंद्रपूर, दि. २३ – बल्लारपूर येथील बाजारपेठेत भरदिवसा दुकान जाळण्याचा प्रयत्न करत गोळीबार करण्याची गंभीर घटना घडली. ही घटना अत्यंत निष्काळजीपणे हाताळून जनतेत रोष निर्माण करण्यास जबाबदार पोलीस निरीक्षक आसिफरझा शेख यांची तात्काळ बदली करा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना दिले.
६ जुलै २०२४ रोजी बल्लारपूर येथील मालु वस्त्र भंडार येथे अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल बॉम्ब टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न करीत गोळीबार केला. बल्लारपुरातील गांधी चौक या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा हल्ला झाल्याने व्यापारी वर्गात व सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निमार्ण झाले. या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली होती. मात्र बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफरझा शेख यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले.त्यांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हेगारांना अभय मिळत राहिले. शेख यांच्या कृतीमुळे जनतेमध्ये अत्यंत रोष निमार्ण होऊन शहरामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले.
या संपूर्ण परिस्थितीसाठी जबाबदार पोलिस निरीक्षक आसिफरझा शेख यांची बदली करण्याची मागणी लोकप्रतिनीधींकडून देखील करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पोलिस निरीक्षक आसिफरझा शेख यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले