गडचिरोली: जिल्ह्यात आज पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरुच आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून, तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून तो ३ लाख ५४ हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. ३३ मार्गावरील वाहतूक अजूनही ठप्पच आहे. पूर परिस्थिती बघता जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी २३ जुलैला शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
दोन दिवस पडलेला मुसळधार पाऊस आणि धरणातील पाण्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी, आलापल्ली-ताडगाव, भामरागड- एटापल्ली, आलापल्ली-सिरोंचा, आष्टी-आलापल्ली या प्रमुख मार्गासह ३३ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे.
मागील २४ तासांत कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल देसाईगंज तालुक्यात ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजच्या कामावरील ७० कामगारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, तर पारडी येथील १९ जणांना गावातच स्थलांतरीत करण्यात आले आहे.
काल रात्री ९ वाजताच्या सुमारास भर पावसात मुलचेरा-आलापल्ली मार्गावरुन मोटारसायकलने प्रवास करताना नवीनकुमार रेड्डी नामक व्यक्तीचा झाडाला धडक दिल्याने मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे १२ घरांचे अंशतः नुकसान झाले, तर एक गोठा पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे.