चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील साटगाव ते हिवरा रोडवरील पूल आज पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पूल वाहून गेल्याने बऱ्याच गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर आणखी एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साटगाव वरून हिवरा, वाकर्ला, बोरगाव, मेढा, नक्षी मार्गे भिवापूर जाणारा हा मार्ग असून या मार्गी रोजच वर्दळ असते. दोन वर्षापासून हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाचे बांधकाम आधी होणे हे फार गरजेचे होते. परंतु बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधीने या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आता हा पूल पावसाळ्याच्या दिवसात वाहून गेल्याने याला जबाबदार कोण? तसेच पावसाळा सुरू असताना तात्काळ या पुलाचे बांधकाम होणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहे.
पूल वाहून गेल्याची माहिती साटगाव येथील उपसरपंच प्रीती दीडमुठे यांना होताच त्या नागरिकांसह घटनास्थळी पुलावर हजर होऊन पाहणी केली. व याची माहिती संबंधित विभागाला देऊन या पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी केली. आणि या पुला चे बांधकाम विधानसभा निवडणुकीच्या आत न केल्यास कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मत मागायला गावात येऊ देणार नाही, असा इसारा उपसरपंच व साटगाव हिवरा येथील नागरिकांनी दिला आहे.