आनंद दहागावकर/गडचिरोली
गडचिरोली : लवकरच गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक असलेली ओळख पुसली जाणार असून गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून नवीन ओळख प्राप्त होणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अहेरी तालुक्यात 5 हजार कोटी रुपये खर्चुन स्टील प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. येत्या 17 जुलै रोजी सुरजागड इस्पात या स्टील प्लांटच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.
अहेरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा, नक्षलग्रस्त भागात उद्योग यावे म्हणून 250 एकर शेती दान केल्याची माहिती आत्राम यांनी दिली आहे. “माझं येवढ्या वर्षांचं स्वप्न साकार होत आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात औद्योगिक वाटचालीला गती देण्यासाठी इस्पात स्टील प्लांट एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 17 जुलैला सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्पाचं भुमिपुजन होणार आहे.”
प्रकल्पाच्या पायाभरणीनं एक स्टिल उत्पादनाचं हब म्हणून गडचीरोलीची ओळख निर्माण होणार आहे. सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील हा पाच हजार कोटींचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. आदिवासी भागातील गोर गरिब तरुणांना स्टील प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. स्टील प्लांटची निर्मिती एकूण 350 एकर क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी 250 एकर शेती धर्मरावबाबा आत्राम यांनी दान केली आहे. त्यामुळं नक्षलग्रस्त भागात रोजगाराला चालना देण्यासाठी व गडचीरोलीच्या औद्योगिक विकासासाठी सूरजगड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.