मूल प्रतिनिधी
मुल तालुक्यातील जवळपास 17 किलोमीटरवर असलेल्या बाबराळा येथे बस सेवा पहिल्यांदाच पोहोचली असल्याने ग्रामस्थांनी बस चे जंगी स्वागत केले आहे.
या गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये ही बस सेवा पोहोचलीच नसल्याने नागरिक त्रस्त होते. गाव तेथे बस ही शासनाची योजना असली तरी बाबराळा सारखी कित्येक गावे आजही बस सेवेपासून वंचित आहेत. मंगळवार (दि ९) ला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पहिल्यांदाच लालपरी बाबराळा येथे पोहोचल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी यावेळी चालक व वाहक यांना शाल, श्रीफळ देत सत्कार केला.
बाबराळा येथे बस सेवा सुरू व्हावी म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाला अनेकदा निवेदन दिली. व सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाने दखल घेत बस सेवा सुरू केली आहे. बाबराळा येथे फक्त ४ थि पर्यंत चे शिक्षण आहे. पुढील शिक्षणाकरिता विध्यार्थ्यांना बाहेर गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागते. बाबराळा गावा पासुन तालुक्याचे ठिकाण १६ ते १७ किमि. अंतरावर असुन विध्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी कोणतेही वाहतुकिचे साधन नाही. मुल भेजगाव बेंबाळ मार्गावर असलेला बाबराळा बसस्थानक गावापासुन २ कि.मी. अंतरावर असल्यामुळे विध्यार्थ्यांना बसस्थानकावर वेळेवर पोहोचने शक्य होत नाही. करीता फिस्कुटी मार्गे गडिसुर्ला वरुन बाबराळा गावापर्यंत सकाळी ७.०० वाजता आणी सांयकाळी ५.०० वाजता बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच धिरज गोहणे यांनी केली होती.
बाबराळा गावात प्रथमच बस सेवा सुरू झाल्याने गावचे सरपंच धिरज गोहणे उपसरपंच अनिता शरद नाहगमकर,ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त बाबराळा वासीय ग्रामस्थ यांच्या हस्ते महामंडळाचे कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आला. बाबराळा येथे बस सेवा सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या ही बस फायदेशीर ठरणार आहे.
बाबराळा येथे बस सेवा सुरू व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून निवेदन देत मागणी केली होती. मात्र आज प्रत्यक्षात गावात बस आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.बस मुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे.
धिरज गोहणे, सरपंच बाबराळा