झडशी (वर्धा) :- शांती निवास भवन बापुकुटी, सेवाग्राम येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाचे राज्य उपाध्यक्ष धनराज बलवीर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकी दरम्यान प्रमोद महाजन यांची राज्य कार्यकारिणी मध्ये निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्वानुमते जवळच्याच अंतरगाव येथील पोलीस पाटील सुभाष खोबे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तसेच पोलीस पाटील सेवेत असताना मृत्यू पावल्यास कुटुंबियांना रु पाच लाख रोख मदत शासना तर्फ देण्यात यावी या करिता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडावा या संबंधी सर्व आमदार यांना निवेदन देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुभाष खोबे यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
या बैठकीचे उत्तम आयोजन प्रमोद महाजन यांनी केले तर प्रास्ताविक अविनाश घोरपडे यांनी सादर केले. आभार प्रदर्शनात समिर डाखोळे यांनी केले. बैठकीला उपस्थित सर्व सेवाग्राम, सेलू, समुद्रपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस पाटील यांचे आभार मानले व भोजनाचा कार्यक्रमाने या बैठकीची सांगता करण्यात आली.