गडचिरोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 68 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 295 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र हा अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या विधानसभा क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या पाचही तालुक्यात अनेक मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पोलिंग पार्ट्याना सुरक्षितरित्या तीन दिवस अगोदरच बेसकॅम्प वर पाठविले जात आहेत. त्या अनुषंगाने
जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जिवने यांच्या नेतृत्वाखाली योग्य असे नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, १६ ते १८ एप्रिलपर्यंत तीन दिवस पोलिंग पार्ट्या विविध भागात रवाना करण्यात येणार आहेत. पोलिंग पार्ट्याना सोडण्यासाठी वायूसेनेचे दोन हेलिकॉप्टर एस. बी. कॉलेजच्या पटांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवर सोमवारी दुपारीच दाखल झाले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पहिल्यांदाच वायुसेनेचे हेलिकॉप्टर या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले आहेत.
अहेरीचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जिवने यांची प्रत्येक बाबीवर बारीक नजर आहे. सध्या तीन दिवस सुरक्षितपणे पोलिंग पाटर्या बेसकॅम्पवर रवाना करण्याचे काम सुरू असून जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल व अप्पर अधीक्षक यातीश देशमुख, आणि अहेरी चे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे.
या कामात पाच तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पोलीस प्रशासन सज्ज आहेत.