मूल (रोहित कामडे) : तालुक्यात अवैध सुगंधीत तंबाखु विक्री मोठया प्रमाणावर सुरू असतानाही ना पोलीस प्रशासन लक्ष देत ना अन्न औषध प्रशासन,यामुळे आता खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष देवुन तालुक्यात तेजीत सुरू असलेल्या अवैध सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
झटपट पैसे कमाई करण्याच्या लोभापाई युवकांना अक्षरशः विष खाऊ घालणाऱ्या सुगंधीत तंबाखु माफियांकडुन राज्याने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखुची सर्रास विक्री होत आहे. तालुक्यातील अनेक दुकानांमध्ये मूलच्या सुगधीत तंबाखु माफियांकडुन पुरवठा केला जात असतांनाही त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही हा चिंतनाचा विषय ठरला आहे.
मूल शहरातील गोळया बिस्किटच्या 2 दुकानदाराकडुन सुगंधीत तबाखुची तालुक्यात तस्करी केल्या जात असल्याची खमंग चर्चा मूल शहरात आहे. चंद्रपूर येथील जयसुख आणि वसिम नामक सुगंधीत तंबाखु माफिया मूल येथील तिन ते चार तस्करांना सुगधीत तंबाखुचा पुरवठा करीत आहेत. त्यांच्या मार्फतीने मूल तालुक्यात अवैध सुगधींत तंबाखु विक्री केली जात आहे. तालुक्यातील अल्पवयीन मुले,विद्यार्थी,तरूण वर्ग मोठया प्रमाणावर सुगंधीत तंबाखुच्या आहारी जात आहे.
लोकांच्या शरीरात विष पेरणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या सुगंधित तंबाखु माफियावर कारवाई होईल का ? झोपी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन या दोनही विभागाला जाग येईल का? सुगंधित तंबाखु आणि गुटखाबंदी कायदा केवळ नावापुरताच असल्याचे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिसून येत आहे.दररोज हजारो लोकांच्या शरीरात विष पेरणाऱ्या सुगंधित तंबाखु माफियांवर अंकुश कोण लावणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.
सुगंधीत तंबाखु विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करू : मंगेश पोटवार
मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैध सुगंधीत तंबाखु विक्री होत आहे,यासंबधाने अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे.येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी दिली.*