आनंदवन :- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे समर्थ व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. या योजनेअंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे,स्पर्धांचे आयोजन होत असते.त्यातलीच एक महत्त्वाची राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे उत्कर्ष. उत्कर्ष 2023-24 राज्यस्तरीय सामाजिक, सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 17 मार्च ते 20 मार्च 2024 या कालावधीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात आनंदनिकेतन महाविद्यालयातील आचल चिकटे, आशिष माणूसमारे व रुपेश कुत्तरमारे यांची निवड झाली.या तीनही स्वयंसेवकांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा कायमच उत्कृष्ट राहिलेला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे यावर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत झालेल्या ‘आव्हान’ या शिबिरासाठीही महाविद्यालयाचा विद्यार्थी रुपेश कुत्तरमारे व ‘प्रेरणा’ या शिबिरासाठी निकिता माणूसमारे यांची निवड झाली होती. दोघांचा या शिबिरातील सहभाग अतिशय उत्तम राहिला.
त्यांच्या या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे,कार्यक्रमअधिकारी प्रा. मोक्षदा नाईक व प्रा.सुरेश राठोड, विभागीय समन्वयक डॉ.रंजना लाड महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आनंदवन परिवार यांनी अभिनंदन केले आहे.