गडचिरोली:जिद्द व त्याला मेहनतीची जोड असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे आपण नेहमीच ऐकत असतो. पण गडचिरोली मधील एका विद्यार्थ्याने ही बाब खरी करून दाखविली आहे.मेहनतीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण मधील भौतिक मानववंशशास्त्र विभागात संशोधन सहयोगी पदाला गवसणी घातली.गट-ब चे रिसर्च ऑफिसर एकंदरीत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाल्याने गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सिरोंचा तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम कोटापल्ली हा गणेश चंद्रू रामटेके यांचा मूळ गाव.आजही हा परिसर अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो.वडील शेतमजूर असून घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती.त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांनी सातवी पर्यंतचा शिक्षण घेतला.त्यानंतर गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयातील भगवंतराव हायस्कुल मधून त्यांनी वसतिगृहात राहून इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले.घरची हलाखीची परिस्थिती मात्र अभ्यासात हुशार असल्याने वसतिगृहातील सिनियर विध्यार्थी आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनात त्यांनी पुढील शिक्षणासाठी थेट पुणे गाठले. समाजकल्याणच्या वसतिगृहात राहून त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय,येरवडा (पुणे) येथे विज्ञान शाखेतून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज मधून झुलॉजी विषयातून बी.एस.सी पूर्ण केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून मानववंशशास्त्र विषयातून एम.एस.सी पूर्ण केले. २०२० मध्ये त्यांनी नेट परीक्षा पास करून ते सध्या भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण मधील सीआरसी नागपूर येथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम करत आहेत.
आता त्यांची भौतिक मानववंशशास्त्र विभागात संशोधन सहयोगी म्हणून नियुक्ती झाली आहे.नुकतेच २६ फेब्रुवारी रोजी नियुक्ती आदेश मिळाले असून पुढील आठवड्यात ते रुजू होणार आहेत.विशेष म्हणजे मोलमजुरी करणाऱ्या चन्द्रु रामटेके यांना दोन मुले आणि एक मुलगी असे तीन अपत्य असून घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे गणेश ला प्राथमिक शिक्षण घेणे सुद्धा कठीण होते.गणेश यांच्या अशिक्षित वडिलांना मुलाने उच्च शिक्षण घ्यावे असे वाटायचे. म्हणून त्यांनी पोटाला चिमटा घेत मुलाला शिकवले.१० वि नंतर थेट पुणे गाठलेल्या गणेश ने कधीच मागे वळून बघितला नाही.त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.
भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि याचे काही मोजके लहान प्रादेशिक केंद्र आणि उपकेंद्र आहेत.गणेश रामटेके हा गडचिरोली जिल्ह्यातील कदाचित पहिलाच विध्यार्थी आहे ज्याने या पदाला गवसणी घातली.त्यामुळे सर्व स्तरावरून त्याचे कौतुक केले जात आहे.