मूल प्रतिनिधी :-तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या दाबगाव ग्रामपंचायत येथील सरपंच व उपसरपंचपदाची बुधवारी दुपारी २ वाजता निवडणूक पार पडली. चुरशीच्या लढतीत सरपंचपदी निर्मला अनिल किरमे, तर उपसरपंचपदी योगिता नीलेश गेडाम विराजमान झाल्या.
सात सदस्यीय असलेल्या दाबगाव मक्ता ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्पित ३, भाजप समर्पित २ व इतर २ असे एकूण ७ सदस्य निवडून आले. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुमताचा आकडा जमवून इतर २ सदस्यांना हाताशी घेत योगिता गेडाम यांना सरपंच तर अतुल आनंदराव बुरांडे यांना उपसरपंचपदावर विराजमान केले.
सरपंच व उपसरपंचपद हे ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षे कालावधीचे होते.त्यानुसार अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच,उपसरपंच यांनी राजीनामा दिला.ठरल्याप्रमाणे सरपंचपदी ममता पिपरे तर उपसरपंचपदी विलंबर गेडाम विराजमान होणार होते.मात्र येथील माजी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्याच एका सदस्याला हाताशी घेऊन राजकीय उलथापालथ करीत भाजप समर्पित सरपंच व उपसरपंच बसवीत काँग्रेसला सत्तेपासून दूर केले. त्यामुळे येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.