भामरागड:ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी ओसाड आणि खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारला. कुष्ठ रुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचे बळ दिले आहे.भामरागड सारख्या अतिसंवेदशील भागात त्याकाळी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ प्रकाश आमटे यांच्यावर धुरा सोपविली. विकास आणि प्रकाश या त्यांच्या कर्तुत्ववान मुलांनी बाबा आमटे ह्यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे हे गेली 50 वर्षापासून भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचे जगणं सुसहाय्य व्हावं म्हणून प्रयत्नरत आहेत.आज हेमलकसा येथे असलेला ‘लोकबिरादरी’ प्रकल्प म्हणजे आदिवासींचे आशास्थान असल्याचे प्रतिपादन माजी आ. दिपक आत्राम यांनी केले.
23 डिसेंबर रोजी लोक बिरादरी प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे.यावेळी माजी आ.दीपक आत्राम यांनी उपस्थित राहून डॉ प्रकाश व डॉ मंदाकिनी आमटे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरविले. निरोगी आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी आलापल्ली चे माजी सरपंच विजय कुसनाके तसेच भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भामरागडच्या दुर्गम जंगलात 1972 साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. 23 डिसेंबर 1973 साली हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली पन्नास वर्षापासून काम सुरू आहे. माडिया, गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्यांना जंगलापलीकडचा जग माहित नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय, शाळा आहे. या ठिकाणची मुलं शिकून डॉक्टर, वकील, अभियंते, फॉरेस्ट गार्ड, ग्रामसेवक, तलाठी झाले आहेत. आजही या ठिकाणी उत्तम आरोग्याची सुविधा आणि शिक्षण दिल जात आहे. ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना जाते .असे सांगत त्यांनी आरोग्य,शिक्षण आणि सिंचनासाठी काम करणाऱ्या आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीला सुद्धा त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.