पुलगाव – भारतीय लष्करातील शूर जवानांनी करुणा आणि मानवतेचा आदर्श घालून दिला. १२ डिसेंबर रोजी सुरक्षा तपासणी दरम्यान बिबट्याचे ४ महिन्यांचे पिल्लू आजारी अवस्थेत आढळले. प्रशासनाच्या सुरक्षा अधिकाऱ्यानी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक क्षणाचाही विलंब न लावता तातडीने केंद्रीय दारुगोळा भांडारात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी स्थानिक वर्ग १ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पत्र पाठवून आजारी ४ महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लावर उपचार करण्याची विनंती केली. वैद्यकीय अधिकारी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने केंद्रीय दारूगोळा भांडारात दाखल झाले. वेळीच उपचार मिळाल्यानंतर बिबट्याचे पिल्लू निरोगी दिसू लागले. डॉक्टरांच्या सल्ल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिलाला वर्धा येथील रुग्णालयात हलवले असून गरज पडल्यास त्याला नागपूरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. ४ महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू पूर्णपणे निरोगी झाल्यानंतर त्याला केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या जंगलात त्याच्या आईकडे सोडण्यात येईल.
केंद्रीय दारूगोळा भांडार पुलगावचे कमांडर ब्रिगेडियर कौशलेश पंघाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम पूर्ण करण्यात आली.