पुलगाव – मागील अनेक महिन्यांपासून शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा काळाबाजार सुरु असल्याचे राज्यातील विविध जिल्ह्यात दिसून आले आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करीत वर्धा जिल्ह्यात सुरु असलेल्या पोषण आहारातील काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून कंत्राटदार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी एकूण मालवाहू वाहनासह ८ लाख ६९ हजार ८१० रुपयांचा पोषण आहारातील धान्यसाठा जप्त केला आहे.
या प्रकरणी किशोर नारायण तापडीया (४६ रा. रामनगर), विनोद बबन भांगे (४० रा. बोरगाव मेघे), शेख रहीम शेख करीम (४६ रा. स्वस्तिक नगर सावंगी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असून मुख्य कंत्राटदार अंकित सतीश अग्रवाल रा. मुर्तीजापूर हा फरार असल्याचे सेवाग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार मालवाहू चालक विनोद भांगे याला वाहनासह ताब्यात घेतले असता २५ क्विंटल तांदुळ अवैधरित्या वाहतुक करताना मिळुन आला. त्याने हा तांदुळ किशोर तापडीया याच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोदामातून विकत घेतल्याचे सांगितले. आणि आरोपी शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याचे सांगितले. आरोपी किशोर तापडीया हा वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना शाळांना शासनाकडुन पुरविण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करुन तो तांदुळ विकतो. असे निष्पन्न झाल्याने गोदामाची तपासणी केली असता एफसीआयचे सिल लागलेले व पोत्यांवर ‘राज्य सरकारी विपणन संघ मर्यादीत’ असे पिंट केलेले ५० किलो वजनाचे तांदुळानी भरलेले पोते दिसुन आले. तसेच गोदामात रिकामे पोते, मटकी, खाद्य तेल, मिरची पावडर व आदी पाकिटं तसेच एफसीआय गोदामात धान्य उचल केल्याचे बिल पावत्या, मालाच्या देवाण-घेवाणचे रजिस्टर मिळुन आले. किशोर तापडीया याला विचारणा केली असता फरार आरोपी अंकित अग्रवाल याला वर्धा जिल्हयातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानीत शाळांना धान्य पुरविण्याचे कत्रांट देण्यात आले असुन अंकित अग्रवाल याने धान्य पुरविण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट हे किशोर नारायण तपाडीया याला दिलेला आहे. किशोर तपाडीया याने जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवठा करण्याकरीता एफ सी आय गोदामातून घेतलेला तांदुळ खासगी गोदामात साठवणूक केल्याचे समजल्याने त्यास अटक करुन तब्बल ८ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी असाच प्रकार सुरु असून हिंगणघाट आणि कारंजा येथे कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.